चतुरंग ? – Chess

चतुरंग ? – Chess

प्राचीन काळात ‘चतुरंग’ म्हणून ओळखला जाणारा बुद्धिबळ ही भारताची जगाला देणगी आहे. चतुरंग म्हणजे ‘सैन्याची चार अंगे’, पायदळ, घोडदळ, हत्ती आणि रथ. राजे राजवाड्यांच्या काळातील या खेळाचे साधर्म्य सैन्य आणि युद्धामधल्या रणनीतींशी दिसून येते. आज जगभर जो ‘चेस’ खेळला जातो त्याला पाश्चिमात्य बुद्धिबळ म्हणून ओळखले जाते. या खेळाची लोकप्रियता इतकी दिसून येते, की बोलीभाषेतही अनेकदा ‘चेकमेट’, ‘शह आणि मात’ या वाक्प्रचारांचा वापर होताना दिसतो. चौसष्ट चौकटी किंवा घरे असणाऱ्या पटामुळेच या खेळातील मातब्बर खेळाडूस चौसष्ट घरांचा राजा म्हणून संबोधले जाते. शाळकरी विद्यार्थ्यांपासून विविध क्षेत्रातल्या दिग्गजांपर्यंत सर्वांनाच आवडणारा हा खेळ आपल्याला मनोरंजनापलीकडेही बरंच काही शिकवून जातो. बुद्धिबळामधील वेगवेगळ्या खेळी या केवळ मनोरंजनात्मक नाहीत तर आपल्या रोजच्या व्यवहारातील अनेक धडे त्या आपल्याला देतात. सर्वांना प्रिय असा हा खेळ केवळ एक साधा बोर्ड गेम असण्यापलीकडेही जास्त काही असू शकतो का? थोडा विचार केला तर बुद्धिबळाच्या खेळी आणि व्यवसायातील खेळी यात कमालीचे साधर्म्य सांगता येईल.

व्यावसायिकांशी संबंध जोडता येईल असे काय आहे या खेळात? बुद्धिबळामध्ये खेळाडूंना प्रत्येक खेळी ही शांतपणे आणि सर्व शक्यतांचा विचार, अभ्यास करत खेळावी लागते. व्यवसाय जगात तरी वेगळे काय असते? व्यावसायिकांसाठी सर्व बाजूंनी स्पर्धेचे वातावरण, अंतर्गत संघर्ष, भविष्यासाठी नव्या योजना अशा अनेक पातळ्यांचा एकाच वेळी विचार करत व्यवसाय धोरणे ठरविणे आवश्यक ठरते. बुद्धिबळ व व्यवसाय दोन्हीमध्ये योग्य नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि त्याचा योग्य अवलंब करणे आवश्यक आहे. केवळ काळ्या पांढऱ्या रंगाचा पट व प्रत्येक खेळाडूंकडे सोळा सोंगट्या एवढ्या अल्प साहित्याद्वारे जरी हा खेळ खेळला जात असला तरी खेळाडूंना असणारे खेळाचे सखोल ज्ञानही तेवढेच महत्वाचे असते. खेळामध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूवर योग्य संधी पाहून चढाई करणे तर कधी बचावाचे धोरणही स्वीकारावे लागणे हे सर्व जेवढे आवश्यक असते त्याचप्रमाणे व्यवसाय लहान असो किंवा मोठा, त्यासाठी त्या व्यवसायाचे सर्वांगीण ज्ञान, योग्य धोरणे आखणे, विविध क्लृप्त्या लढविण्याची हातोटी याच गोष्टी व्यावसायिकास यशस्वीतेकडे घेऊन जातात.

अफाट लोकप्रियता मिळालेल्या, जगभरात साधारण ६० कोटी लोकांकडून हौशी किंवा व्यावसायिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या या खेळात जागतिक पातळीवर यश संपादन केलेली अनेक मराठी नावेही आपल्याला चमकताना दिसतात. उद्योगांच्या जगातही अनेक यशस्वी मराठी व्यावसायिकांची नावे ठळकपणे दिसून येतात. सध्या महाराष्ट्राची ‘औद्योगिक राष्ट्र’ म्हणून एक नवी ओळख निर्माण होताना दिसते. जास्तीत जास्त मराठी तरुणांनी व्यवसायात उतरल्यास ही ओळख आणखीनच मजबूत होईल यात शंका नाही.

  • 20 July 2018

Join our Social Community

Join MarathiKind on its social platforms. Join to have more reach.

Join Facebook Group

Join our MarathiKind Community

Find your Marathi Business community here.

Register Now