दाजीकाका गाडगीळ - PNG

दाजीकाका गाडगीळ - PNG

सराफी व्यवसायात आपला खास ठसा उमटवणारे अनंत गणेश उर्फ दाजीकाका गाडगीळ. दाजीकाकांनी ‘मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ आणि कंपनी’ या नावाने १९५८ साली पुण्यात सराफी व्यवसायास प्रारंभ केला. गाडगीळ कुटुंब मूळचे कोकणातले. त्यानंतर ते सांगलीत स्थिरावले. सांगलीमधे त्यांचा सराफी आणि सावकारी असा जोड व्यवसाय होता. पुण्यात कापड व्यवसायासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावर दाजीकाकांनी व्यवसाय सुरु केला आणि या रस्त्याला सराफी व्यवसायाची ओळख मिळवून देण्यातही मोलाची भर घातली.

सचोटी, पारदर्शकता या गुणांमुळे ‘PNG’ हा ब्रँड अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरला. सोनं, दागिने हा एकूणच भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय! आभूषणांबरोबरच गुंतवणूक म्हणूनही सोन्या चांदीकडे बघितले जाते. त्यात ‘PNG’ कडे व्यवहार म्हणजे खात्रीचा व्यवहार, चोख माल हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण झाला. याच विश्वासातून PNG च्या शाखा पुण्यात व इतर शहरांतही विस्तारत गेल्या व आता अमेरिकेतही शाखा स्थापन करून PNG ने आणखी एक मैलाचा दगड पार केला आहे.

‘माणसे जोडणारा माणूस’ म्हणून दाजीकाका प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबाला व्यवसायात जोडून घेतले होतेच तसेच आपल्या कारागिरांनाही ते कुटुंबियांप्रमाणे वागणूक देत असत. “आपला धंदा हा मालक आणि कारागीर अशी दोन चाकांची गाडी आहे” असे ते नेहेमी म्हणत. या आपलेपणामुळे आणि जिव्हाळ्यामुळे गाडगीळ कुटुंबाबरोबरच सांगलीहून आलेले निष्णात कारागिरही पुण्यात स्थिरावले.

सराफी व्यवसाया व्यतिरिक्त इतर अनेक सामाजिक कार्यांमधे मधे दाजीकाका सहभागी होत असत. पुण्यातील सराफ व्यावसायिकांना एकत्र आणून त्यांनी ‘पुणे सराफ असोसिएशन’ चा विस्तार केला, या संघटनेचे ‘सुवर्णपत्र’ नावाने मुखपत्र सुरू केले. १९८७ साली त्यांनी या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. अनेक समाजसेवी संस्थांना आर्थिक सहाय्य, कलाकारांना बक्षिसे, महिलांना नोकरी सहाय्य व प्रशिक्षण, लातूर भूकंपग्रस्तांना मदत अशा अनेक कार्यातून त्यांची सेवाभावी वृत्ती दिसून येते.

विविध क्षेत्रातील मोलाच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे. पैकी सांगली भूषण पुरस्कार आणि वर्ल्ड गोल्ड काऊन्सिल तर्फे देण्यात आलेली संलग्न भागीदारी हे विशेष उल्लेखनीय होत.

दाजीकाकांचा कामाचा उत्साह व तत्परता हे गुण आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात. आपल्या व्यवसायाला पारंपरिकतेबरोबरच अधुनिकतेचीही जोड देत त्यांनी अनेक नवे बदल स्वीकारले. ग्राहकांची गरज व आवड लक्षात घेत सोन्या चांदीबरोबरच हिरे, रत्ने व आधुनिक दागिन्यांचे विभागही त्यांनी सुरू केले. आपल्या व्यवसायासाठी ब्रँड ॲम्बॅसिडर नियुक्त करण्याची कल्पना खास ठरली. वृद्धापकाळातही ते अखेरपर्यंत कार्यरत होते. २०१४ साली वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगला गोडबोले यांनी लिहिलेले ‘सुवर्णमुद्रा’ हे त्यांचे चरित्रही प्रकाशित झाले आहे. गाडगीळ कुटुंबातील पुढच्या पिढ्याही आता हा व्यवसाय यशस्वीरीत्या सांभाळत आणि वाढवत आहेत.

  • 29 June 2018

Join our Social Community

Join MarathiKind on its social platforms. Join to have more reach.

Join Facebook Group

Join our MarathiKind Community

Find your Marathi Business community here.

Register Now