रविंद्र प्रभुदेसाई | पितांबरी
तांब्या पितळेची भांडी व पूजेच्या उपकरणांची स्वच्छता हे तसं किचकट काम. ‘पितांबरी’ ने ग्राहकांची नेमकी हीच गरज ओळखून तांबे पितळ चमकवण्यासाठी ‘शायनिंग पावडर’ मार्केटमध्ये आणली आणि अल्पावधीतच ‘पितांबरी’ हा एक लोकप्रिय ब्रँड म्हणून उदयास आला. १९८६ मध्ये कै. वामनराव प्रभुदेसाई आणि श्री. रविंद्र प्रभुदेसाई या पितापुत्रांच्या जोडीने ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ ची स्थापना केली. तांब्या पितळेची भांडी साफ करण्याच्या पावडरच्या निर्मितीपासून सुरू झालेल्या ‘पितांबरी’ ने ग्राहकांच्या गरजा ओळखत वेगवेगळी प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणली. याचबरोबर चांदीची भांडी व पूजेची उपकरणे स्वच्छ करण्यासाठी पितांबरीने बाजारात आणलेले ‘रुपेरी’ हे उत्पादनही तितकेच लोकप्रिय ठरले.
व्यवसायाच्या सुरुवातीला श्री. प्रभुदेसाई हे डिटर्जंट व लिक्विड सोपची निर्मिती करत होते. हे युग स्टीलच्या भांड्यांचे असले तरी आजही अनेक घरात तांब्या पितळेची भांडी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. घरच्या तांब्या पितळेच्या भांड्यांच्या स्वच्छतेच्या गरजेतूनच पितांबरीची निर्मिती झाली. या पावडरला मिळणाऱ्या प्रतिसादानंतर त्यांनी हे प्रॉडक्ट देशपातळीवर पोहोचवण्याचे ठरविले. हळूहळू पितांबरीची उत्पादने वाढत गेली व आज होमकेअर, हेल्थकेअर, ऍग्रीकेअर, फूडकेअर, पर्सनल केअर अशा विविध श्रेणींमधली पितांबरीची अनेक उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. रिटेल बरोबरच ऑनलाईन माध्यमातूनही या उत्पादनांची विक्री केली जात आहे.
सतत नाविन्याचा ध्यास घेतलेल्या पितांबरी समूहाने ऍग्रो केअरमध्येही नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यापैकी टिशू कल्चरच्या माध्यमातून लाल रंगाचा केळ्यांची निर्मिती ही उल्लेखनीय मानावी लागेल. या केळ्यांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे. दापोलीला लावलेल्या सोनचाफ्याच्या हजारो झाडांपासून मिळणाऱ्या फुलांचा अर्क नैसर्गिक उदबत्ती साठी वापरला जातो. पितांबरीची हळद, तिखट व मसाले, तिळाचे तेल, मुखवास, बेबी ऑईल, गोमूत्र कॅप्सूल, नैसर्गिक सुगंध असणारी उदबत्ती, सौंदर्यप्रसाधने अशी अनेक उत्पादनेही विशेष लोकप्रिय ठरत आहेत. बाजारात आपल्या उत्पादनांना असणाऱ्या स्पर्धक कंपन्यांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करून उत्पादनात सुधारणा करत राहणे पितांबरीने अनुसरले.
“Plan out your work and then work out your plan.” हा यशाचा मंत्र श्री.प्रभुदेसाई सांगतात. श्री प्रभुदेसाई यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे दिला जाणारा ‘कोकण उद्योग रत्न’ व लोकमत ‘entrepreneur of the year’ हे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. कष्ट, सातत्य, उत्पादनांचा दर्जा टिकविणे यामुळेच पितांबरीला ग्राहकांचा संतोष प्राप्त झाला आहे. मार्केटमधील आपले स्थान टिकविण्याबरोबरच ‘पितांबरी’ विविध प्रकारे सामाजिक बांधीलकीही जपत आहे. पितांबरीतर्फे दर वर्षी झालेल्या नफ्यातून लाखाचा खर्च विविध सामाजिक कार्यांसाठी केला जातो. वाचनालय, करमणूक इ. साठीही देणग्या दिल्या जातात. पितांबरी समूहातर्फे ठाण्यामध्ये चित्रीकरणासाठी अद्ययावत सुविधांसह स्टुडिओही सुरू केला गेला आहे. पितांबरी उद्योगसमूहाची वार्षिक उलाढाल १२० कोटींच्या घरात गेली आहे. येत्या काही वर्षात ही उलाढाल पाचशे कोटींवर नेण्याचा त्यांचा मानस आहे.
- 17 July 2018